Thursday, November 29, 2012

अस्तित्वाची लाज वाटते

पिढी दर पिढी ठायी ठायी दु:ख भोगते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

जन्मताच मी रडले, कोणी हसले नाही
दारावरती तोरण साधे सजले नाही
दिव्या ऐवजी ज्योत जन्मली, माय कोसते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

दादाला तर आई घेते खांद्यावरती
जरी धाकटी, चालत असते ओझे हाती
तो खेळाया जातो अन् मी घरी रांधते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

कधी द्रौपदी, कधी अहिल्या, कधी जानकी
जन्म वेगळे दु:ख भोगणे माझ्या लेखी
पुराणातला स्त्रीचा महिमा फक्त वाचते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

सभोवताली सर्व श्वापदे आसुसलेली
हरिणीसम मी सदैव असते भेदरलेली
गुदमरते पण बुरख्याने मी मला झाकते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

परीघ माझा कुणी आखला मला न ठावे
घाण्याच्या बैलासम मी दिनरात फिरावे
श्वास सोडण्या शेवटचा मी वाट पाहते
मलाच माझ्या अस्तित्वाची लाज वाटते

चार पुस्तके वाचुन पूर्वा दिसू लागली
उजेड घ्याया कवेत आता आस जागली
उध्दाराया राम नको मज मीच चालते
अस्तित्वाची मला अताशा शान वाटते

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment