Monday, November 12, 2012

तेजोमय मी विश्व पाहिले

ठोकरून मी जहाल वास्तव
आनंदाचे गीत गाइले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले

लक्ष्मणरेषा पार जराशी
केली मी, थयथयाट झाला
हेच जानकीने केल्याने
लंकेचा नायनाट झाला
कधी कधी बेबंद जगावे
मला जरासे मीच शिकविले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले

हातामधुनी काल निसटला
कुणास ठावे काय उद्याला
आज फक्त हा माझा आहे
मनाप्रमाणे जगावयाला
मिठीत घेउन "आज" बरोबर
नात्यांचे मी गोफ गुंफिले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले

आनंदाचे अन् दु:खाचे
असणे नसणे मला न कळले
मी अनुभवले दु:खाचेही
आनंदाशी नाते जुळले
जीवन जगलो पूर्ण, जणू मी
अमृत कलशातील प्राशिले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले

छान दिवाळी घरात माझ्या
रोज साजरी करीत असतो
मस्त कलंदर, कधी उद्याची
मनात चिंता ठेवत नसतो
अंतरात झगमगाट आहे
दीप ना जरी कधी लावले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले

काय कारणे देवकृपेची
डोक्यावरती सदा सावली
कर्मकांड, वारी ना करता
देत राहिली विठू माउली
पाणाउन मी त्याच्या चरणी
एक सुगंधी फूल वाहिले
अंधाराला उशास घेउन
तेजोमय मी विश्व पाहिले


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment