Monday, November 26, 2012

प्रकाश आहे मला पुरा

नकोय सागर, नकोत लाटा
झुळझुळणारा हवा झरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा

दु:ख पाचवीला पुजलेले
किती म्हणूनी रडावयाचे?
साध्या साध्या आनंदाला
उगाच का मग मुकावयाचे
कुंडीमध्ये गुलाब लाउन
फुलास बघणे छंद बरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा

पैसा, आडका, जमीन जुमला
असून आनंदास पारखे
खळखळ हसती, खुशीत जगती
गरीब ते माझ्याच सारखे
मला हवे ते उधळत असते
मुक्त कराने वसुंधरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा

दारिद्र्याचा शाप असूनी
सुखात जगला प्रश्नासंगे
किती सुदामा भाग्यवान तो
गुरे राखली कृष्णासंगे
तृप्त जाहला यादव राणा
पोह्याचा खाऊन चुरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा

वैषम्याचे मळभ दाटता
वेळ सरकता सरकत नाही
मीच शोधला उपाय यावर
प्रयत्न करण्या हरकत नाही
ब्रह्मानंदी टाळी लागे
आळविता मी सप्तसुरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा

मयसभेत या सुखदु:खाच्या
तारतम्य का असे हरवले?
नवीन व्याख्या लिहून खोट्या
कुणी कुणाचे कान भरवले?
भ्रामक, आता सत्त्य वाटते
वर्ख भासतो खराखुरा
गाभार्‍यातिल मंद दिव्याचा
प्रकाश आहे मला पुरा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment