Wednesday, November 7, 2012

मला न कळले

सखे जरी ते माझे आहे मला न कळले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

दगडाचे मन माझे आहे भाग्यवान तू
नाव कोरले तुझेच त्यावर नीट जाण तू
आल्या गेल्या कैक, कुणी ते पुसू न शकले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

बावरते मन तुझ्याविना का ठाउक आहे?
एकलपणचे दु:ख तयाला घाउक आहे
वठल्या माझ्या मनास अंकुर कधी न फुटले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

निघून गेली वळ नको ना अता इशारे!
मृगजळात का कुणी पाहिले कधी फवारे?
आनंदाला लिलावात मी कालच विकले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

नदी आटली तरी किनारी कसे बसावे?
झुळझुळ सरली भळभळ आली कसे हसावे?
ठसठसणार्‍या दु:खालाही मी पांघरले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

जुनेच आठव, हरवुन जातो, मन पाझरते
शिळ्या कढीला ऊत आणाया मज आवडते
मोहरते मन पान जरी का आहे पिकले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले


निशिकांत देशपांडे  मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yhoo.com




No comments:

Post a Comment