Sunday, November 4, 2012

एकटे चालावयाला

जाहलो पांगूळ गाडा चालणे शिकवावयाला
का मुलांनो सोडले मज एकटे चालावयाला ?

तू हसावे खूप म्हणुनी लपवले मी आसवांना
तीच आता तुजविना रे! लागलो गाळावयाला

पाहुणा माझ्या घरी मी अडचणीचा जाहलो
मीच अडगळ कोपर्‍यांना लागलो वाटावयाला

वाटते स्मृतिभ्रंश व्हावा अन् करावा श्रीगणेशा
आठवांनो लागता का कातडी सोलावयाला ?

प्रश्न पडला पाहुनी वृध्दाश्रमी मातापित्यांना
संस्कृतीची लक्तरे का लागली लोंबावयाला ?

घाव, जखमा, वेदनांनी हरवली संवेदना अन्
काळजावर वार लिलया लागलो झेलावयाला

वाटते व्हावे अमीबा* एक पेशी जीव, ज्याला
मायबापाचे न ओझे लागते पेलावयाला

श्वान दोघे गाठ पडता भुंकुनी ते बोलती पण
क्षुद्र श्रीमंतात नसतो एकही बोलावयाला

का कणा "निशिकांत" ताठर वाकला आहे तुझा रे /
दु:ख मणभर मीच माझे लागलो पेलावयाला


*अमीबा-- एक पेशीय प्राणी ज्याचा जन्म प्रजनन पध्दतीने न होता गुणन पध्दतीने होतो. आई वडील नसतात त्याला.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com







No comments:

Post a Comment