क्षणभर तुझा हात हाती घेतला
मनाला किती बरे वाटले होते,
जणू साऱ्या जगाशी लढण्याचे
बळच तेव्हा मला मिळाले होते.
तुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे
काहूर त्यावेळी माजले होते,
मला मात्र तुझ्या डोळ्यात
पूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.
तू होतास स्वत:शीच झगडत
सारे मला कसे समजवावे,
मला वाटले निदान आतातरी
माझ्या मनातले भाव तुला कळावे.
मनात सहजच आले
हळूच तुझ्या कुशीत शिरावे,
या हृदयाचे त्या हृदयाला
काही न बोलताच सारे कळावे.
पण पुन्हा माझ्या स्वप्नांनी
माझा घात केला,
जेव्हा सर्व गोष्टींचा तू
अखेर उलगडा केलास.
समजत होती प्रेम
मी इतके दिवस ज्याला,
फक्त निखळ मैत्रीचे नाव
तू दिलेस अखेर त्याला.
दोष तुझाही नव्हताच म्हणा
तू होतास परिस्थितीचा गुलाम,
माझ्याच मनावर योग्यवेळी मी
घालायला हवा होता लगाम.
No comments:
Post a Comment