अघात प्राक्तनाचे मनसोक्त सोसले मी
झाकून दु:ख, ओठी हास्यास गोंदले मी
भीती सदैव जग हे बोलेल काय याची
माझ्या मनाप्रमाणे केंव्हा न वागले मी
छोटा परीघ जगण्या रूढी परंपरांचा
घाण्यास जुंपल्यागत आयुष्य चालले मी
कोणास दोष देणे माझा स्वभाव नाही
दु:खास भोगताना मजलाच कोसले मी
गोष्टीतल्या पर्यांचे स्वप्नील विश्व असते
ओझ्यास वास्तवांच्या दिन रात्र पेलेले मी
शत्रूसवे लढाया होते पुरून उरले
येता समोर अपुले शस्त्रास टाकले मी
दररोज फूल नवखे भ्रमरास छंद भारी
श्रीमान श्रीमतीच्या नात्यास जागले मी
विश्वास घात करणे ज्यांना जमून गेले
सारे सुखात जगले परिणाम भोगले मी
"निशिकांत" बंडखोरी हल्ली मनात येते
दुर्भाग्य रे तुझ्याशी आधी न भेटले मी
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
sundar
ReplyDeleteManapasun abhar Ashwini pratisada sayhi.
Delete