Wednesday, October 31, 2012

श्वास मोकळा

श्वास मोकळा, तुझ्यासवे मी उडता उडता
आयुष्याची मरगळ जाते बघता बघता

तू असताना बारा महिने श्रावण रिमझिम
मोहरते मी मनी उमलते भिजता भिजता

तू येण्याची चाहुल येता, सुस्त दिवसही
पटकन सरतो दर्पणापुढे सजता सजता

मनात माझ्या तूच नांदसी, तू नसताना
अंतरात मी म्हणून बघते उठता बसता

आनंदाचा डोह जाहले जीवन माझे
गुदमर नाही, मस्त वाटते बुडता बुडता

हट्ट कशाला जन्मकुंडल्या जुळवायाचा?
जुळून गेले नाते अपुले जुळता जुळता

चकोरास हा प्रश्न छळे का कधी न त्याची
वाट पहावी चन्द्रानेही ढळता ढळता?

शाश्वत असते दु:ख जीवनी प्रत्त्येकाच्या
नको भांडवल उगाच त्याचे जगता जगता

"निशिकांता" चल धेय एवढे ऊंच आहे की
हात असू दे हाती माझ्या चढता चढता


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment