या रचनेला खास अशी एक पार्श्वभूमी आहे. खूप दिवसापूर्वी दोन मैत्रिणी आमच्या गल्लीत रहात होत्य. त्या खास लक्षात राहण्याचे कारण म्हण्जे एकाच सामाजीक, आर्थिक आणि कौटुंबिक वातावरणात राहून त्यांचे असणारे भिन्न स्वभाव आणि निष्ठा. दोघीही एकाच वर्गात शिकत होत्या. एक अतिशय धोपटमार्गी, रुढीपरंपरांना धरून वागणारी. दोन वेण्या, टोकाला रिबिन्स, नेहमी चापून चोपून राहणारी. थोडक्यात म्हणजे संस्कारक्षम आणि साधी अशी होती. दुसरी अगदी त्या विरुध्द. मॉडर्न, तोकडे कपडे घालणारी, बॉय कट असलेली अशी. मी जे सांगतोय ते एक तालुक्याचे ठिकाण असलेले लहान गाव होते म्हणून बॉयकटचा उल्लेख! बोलणे, हसणे त्या वेळच्या प्रथेविरुध्द; म्हणजेच खूप जोराने. वक्तृत्व स्पर्धेत पण हिरिरीने भाग घ्यायची आणि रूढी, प्रंपरांना छेद देणारे विचार मांडायची . मला यात गैर कांहीच वाटत नसे पण त्या काळी त्या दोघीचे स्वभाव आणि त्यांची मैत्री हे चर्चेचे विषय होते. पहिली दुसरीला कधी कधी भान ठेऊन राहण्याचा सल्ला देई तेंव्हा दुसरी तिला सांस्कृतिक डबके म्हणून हिणवीत असे. माझे जीवन प्रवावी आहे असे थाटात म्हणायची'.
यथावकाश दोघीचेही विवाह झाले. पहिली आज रूढ अर्थाने सुखात आहे. दोन मुले, दोघेही अर्थिक दृष्ट्या वेलसेटल्ड. दुसरीने आपल्या आयुषयाशी नवनवे प्रयोग केले जे तिच्या विचारसरणीशी सांगड घालणारेच होते. ती लग्न न करता लिव्ह-इन-रिलेशनशिप मधे रहिली. हे सर्व माझ्या ऐकिवात होते. कांही दिवसापूर्वी ती मला अचानक भेटली. आणि सर्व जुने आठवू लागले. नंतर असे कळाले की ती आता एकटी असते. तातपुरते संबंध संपले. मला कुठे तरी खूप वाईट वाटले. ती कदचित् खुषही असेल कोण जाणे! पण माझ्या परंपरागत विचारसरणीला तिचे जीवन चटका लाऊन गेले.
वरील घटनेने माझे विचारचक्र सुरू झाले. तिला आज आपल्या जीवनबद्दल काय वाटत असेल? हा प्रश्न माझी पाठ सोडेना. मी माझ्या कुवतीनुसार आणि माझ्या मापदंडाने विचार करत ही रचना लिहिली. ही कविता म्हणजे तिने जगलेल्या जीवनावर माझे मत प्रदर्शन नाही. प्रत्येकाला आपले जीवन आपल्या मर्जीप्रमाणे जगायचा हक्क आहेच या बद्दल बिलकुल दुमत नाही.
वाचकांनी ही पार्श्वभूमी ध्यानात घेऊन ही रचना वचावी असे मला वाटते म्हणून हा सारा प्रपंच.
मनी कुणाला जागा द्यावी
माझ्याशी मी सहमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
एकटेच मी चालायाचा
प्रयत्न केला जरी खूपदा
प्रियाविना भ्याले, गुदमरले
पदरी पडली हार सर्वदा
श्वासालाही निश्वासाविन
जगावयाची हिम्मत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
"प्रेम नको"चा करार केला
लग्नाविन एकत्र राहिले
काम वासना तृप्त जाहली
मुद्दत सरता विभक्त झाले
असे असूनी दोघांनाही
अता वेगळे करमत बाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
पाप पुण्य मी गौण मानले
सुखात नाही हेच काचते
मी वावरते हास्य लेउनी
आत आसवे गाळत असते
चाकोरी बाहेर, जगी या,
जगणार्यांना जनमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
परंपरेच्या विरुध्द केले
बंड काल अन् सुखावले मी
खळखळ वाटे वहात होते
अता उमगले वहावले मी
डबक्यापुढती प्रवाहास का
कळून आले किंमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
सायंकाळी तारुण्यातिल
सर्व सोबती निघून गेले
नकळत सारे जीवन माझे
चिमटी मधुनी सुटून गेले
चुका जाहल्या सजा भोगणे
याहुन दुसरी किस्मत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment