Wednesday, January 16, 2013

ओघळला का पूर असा हा?


आठवणींचा ओघळला का पूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शतजन्माची दोघांचीही ओळख असुनी
या जन्मीही तुला पाहता मागे वळुनी
तुझा चेहरा लज्जेने का चूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

एक जमाना झाला नव्हता सूर गवसला
मैफिल होती उदासवाणी, दु:खी गजला
नव्या सुराने कुणी बदलला नूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शुभ्र चांदणे अशात मजला दिसले नाही
स्वप्नांमध्ये काळॉखाविन उरले नाही
विरहाने का दाटत आहे ऊर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

तुझा चेहरा मनात माझ्या घोळात होता
दवबिंदुंचा ओलावाही पोळत होता
वसंत झाला मजवरती का क्रूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

विरले आता आठवणींचे अधीर वारे
अता चेतना उरली नाही, बधीर सारे
धुमसत नाही, तरी मनी का धूर असा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment