Tuesday, January 15, 2013

वाढला संचार येथे


कौरवांचा वाढला संचार येथे
द्रौपदीला ना मिळे आधार येथे

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे

काय किमया आश्रमी बाबागुरूंची !
नार भाकड राहते गर्भार येथे

लाजही लाजून खाली मान घाली
बेशरम राजेच झाले फार येथे

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

फोडली वाचा गुन्ह्यांना, हा गुन्हा का?
मी कशाला आज ताडीपार येथे?

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

सूर्य भित्रा का असा ढोलीत लपला?
अश्वमेधाला निघे अंधार येथे

मंदिरे होती कधी का ईश्वराची?
भरवती बडवे सदा दरबार येथे

तत्व का "निशिकांत" सोडावे जगाया
जाउ दे! धेंडास मिळती हार येथे


निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mali-- nishides1944@yahoo.com

2 comments: