Tuesday, December 18, 2012

एक कोपरा दाखव देवा

एक कोपरा दाखव देवा
परवा दिल्लीत बसमधे एका तरुणीवर कांही श्वापदांनी बलात्कार केला. ही बातमी वाचून आणि टी.व्ही.वर या बाबत चर्चा ऐकून मन उद्विग्न झाले. प्रथमच मला मी एक भारतीय असल्याची लाज वाटली. अतिशय दु:खी मनाने ही रचना लिहिली नाही तर कलमेतून आसवांप्रमाणे ओघळलेली आहे. प्रस्तूतः

तारुण्याच्या लोण्यासाठी
शक्य कसे हे? बोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

मला वाटते स्त्रीची अब्रू
मळलेल्या कणकीसम असते
घरात उंदीर कुरतडती अन्
गिधाड बाहेर चोंच मारते
एक रात्रही नसते जेंव्हा
चुकला ह्रदयी ठोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

कसा कायदा देशामध्ये?
बलात्कारिता दु:ख भोगते
पळवाटांचा घेत सहारा
नराधमांचे खूप फावते
अटके आधी मिळे जमानत
बाल तयांचा बाका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

इमाम, पाद्री, भगवे साधू
सभ्य मुखवटे, क्षुद्र माणसे
धर्म अफूची गोळी देती
कुणी न पाळी तत्व फारसे
सार्‍या नजरा वखवखलेल्या
कुणीच बाबा काका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

नराधमाला स्त्रीलिंगी अन्
पतिव्रतेला पुल्लिंगी का
शब्द नसावा? तुझी माणसा
हीच खरी रे शोक-अंतिका
सभ्य मुखवटा टिकून असतो
जोवर गावत मौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

ऐलतिराची गंगा थकली
धुवून पापे दुष्टजनांची
काय राहिले जगात आता?
ओढ लागली पैलतिराची
तरावयाला भवसागर हा
आज कुठेही नौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment