वाटते घ्यावी जरा माघार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली
पाप इतके जाहले हातून माझ्या
मी लपाया शोधतो अंधार हल्ली
माणसे गेली कुठे? ओसाड वस्ती
का भुतांचा वाढला संचार हाल्ली
मी लढू आता कुणाशी? सर्व अपुले
लावतो शस्त्रास मी ना धार हाल्ली
हद्दपारी जाहली संभाषणांची
का मनाचे बंद असते दार हल्ली?
मीच माझे पाप निस्तारीन म्हणतो
कोण देतो का कुणा आधार हल्ली?
सांगती जे अर्थ गीतेचा, तयांना
ज्ञात नसते जीवनाचे सार हल्ली
मंदिराचे दार मिटले, वेळ झाली
रात्रभर असतात उघडे बार हल्ली
भीड बघता पापियांची स्नान करण्या
घाबरे गंगा नदीही फार हल्ली
सोडले "निशिकांत"ने प्रतिकार करणे
प्राक्तनाचा खात जगतो मार हल्ली
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment