Sunday, December 23, 2012

मी किती ते आवरावे?


आठवांच्या अडगळीला
कारणाविन का जपावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

जे सुखाचे क्षण दिले तू
काचती आता मनाला
कोंडल्याने अंतरी ते
दु:ख वाटे हर क्षणाला
सांगण्या सल हा मनीचा
मी कुणाला बोलवावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

ना कुठेही आडपडदा
पारदर्शक हा असा मी
जे मनी ते बोलण्याचा
घेतला आहे वसा मी
काळजाला मुखवट्याने
वेगळे का रंगवावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

छेडले होते तराने
मी सतारीवर जरासे
का अशा तुटल्यात तारा?
काय कामाचे खुलासे?
हरवलेला सूर असता
गीत कुठले गुणगुणावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

झोपल्यावर रोज रात्री
तू अशी येतेस का?
जाग आल्यावर त्वरेने
सांग तू विरतेस का?
जाग का आली म्हणूनी
रोज मी का हळहळावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment