चांदण्यांचे प्रदेश...
आभाळातली चंद्रकोर
तुझ्या गालाच्या खळीत उतरते तेव्हा
मी विरघळत, विरघळत जातो
तुझ्या चांदण्यांच्या प्रदेशात...
मनात जपलेल्या तुझ्या मोग-याच्या आठवणी
झरु लागतात त्याच चंद्रकोरीच्या साक्षीने...
तुझ्या डोळ्यांतलं काजळ जेव्हा
स्पर्धा करतं ना माझ्या ओठांशी
तेव्हा... मनाला उधाण येतं...
चांदण्यांच्या प्रदेशात काजळाचा रंग
जसजसा मिसळत जातो ना, तसतसे
विस्कटतो आपण...
हे विस्कटणं, आवडीचं असतं, तुझ्याही आणि माझ्याही...
विस्कटलेल्या शरीरांना आवरताना आणि
विस्कटण्याचे नवे जुने संदर्भ शोधताना
नंतर दोघांनाही उमगतं,
बाकी काहीहीजुनं झालेलं असलं ना तरीही
आभाळातली चंद्रकोर आणि मनातला मोगरा
सतत तसाच नवा आहे... सतत तसाच नवा आहे...!
कवी - महेश घाटपांडे
No comments:
Post a Comment