तुझ्या आठवांचा किती हा पसारा !
पसारा जरी, तोच माझा उबारा
नको हाक देऊस इतक्या उशीरा
मनातील तुटल्यात केंव्हाच तारा
त्सुनामीत बेजार मी भावनांच्या
मनी आस नुरली मिळावा किनारा
पुन्हा प्रेम करणे मला शक्य नाही
कशाला विषाची परिक्षा दुबारा ?
किती चेहरे मख्ख शेजारच्यांचे !
कुणाचाच नव्हता मिळाला सहारा
असा लिप्त मी आज दु:खात आहे !
जुना दाह वाटे सुखाचा नजारा
मनुष्यात फोफावला स्वार्थ इतका
कुणीही कुणाचाच नसतो दुलारा
भरायास खळगी किती राबलो मी
तुझा जीवना हाच रे गोषवारा
लिहावेस "निशिकांत" तू भाग्य अपुले
स्वतःला समजतोस तू का बिचारा ?
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment