Thursday, November 28, 2013

प्रिय सर्दीस

बेक्कार सर्दी झालीय आणि डोकं काम करत नाहीये म्हणून, मूळ कवीची माफी मागून...
___________
प्रिय सर्दीस,

असतेस सोबत तू जेव्हा
नाक गळके गळके होते
रुमालांचेचे भिजती तागे
डोके जडशीळ होते

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही शिंक दिशाहीन होते
अन्‌ मग फवारा उडतो

येतात धारा नाकाशी
मुसमुसून ओढतो मागे
रुमालाशी जोडून नाका
लांबवर फुरका मज भंजाळून जातो

हळदीच्या दुधात विरघळणार्‍या
मज आठवती तिखट सुंठीच्या ज्वाळा
फुरफुरी द्वारे श्वास अडावा
झोपताना अगतिक होतो

तू सांग आता मज काय
मी करु या चोंदल्या नाका?
झोपताना होई जीव कासावीस
तोंडाने कसाबसा श्वास घेतो.

ना अजून झालो बरा
नाक ना अजूनी मोकळे झाले
मिशांचे होती भाले
रुमाल कितीक स्टार्च झाले.

Friday, November 22, 2013

हा चंद्र भारलेला संमोहनात मीही

हा चंद्र भारलेला संमोहनात मीही 
का सांग चांदण्यांना तू माळलेस देही?

आली कुठे तुफाने ना प्रलय वादळांचा 
जगतोस तू तिथे अन जगते सुखात मीही 

मजलाच शोधताना धुंडाळते किती मी?
मिळतो तुझा विसावा असते दिशात दाही

कळले किती उशिरा होता करारनामा 
लिहिल्यास तू जरी ना मी मानल्या अटीही!

शेतात राबताना होतो रियाज जेंव्हा 
फुलती मळ्यात कणसे..घामातली कला ही 

केले मना तुला...ना येणार मैफलीला 
का साज रंग ल्याले मर्जीतला तरीही?

आहेत सांडलेले वाटेत थेट काटे 
जाणीव का तुला ही? जाणीव का मलाही!! 

- योगिता पाटील

जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू

जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू 
अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू !..

किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना
जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !..

सखे मला अखेरचे पुन्हा तुला पहायचे 
भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

तुझीच वाट पाहतो अजून चातकापरी
कुठूनही पुकारता निघून यायचीस तू !..

चुका-मुकीत अक्षरे अचूक शब्द शोधतो 
चुकून भेटशील ना कधी तरी वहीस तू ?..

मुळात जाहले इथे तुझेच घाव बोलके
दगा तुझा व्यथा तुझ्या सखे तरी परीस तू !..

उगाच मखमली मिठीत घेतलास हा गळा
उरात दाटली गझल स्वरात भेटलीस तू !.. 

सुधीर...