प्रत्येक दिवसाची... तासाची... क्षणाची...
आता मी पण उभा आहे बाजारात...
आठव, आणि लाव किंमत,
गालावर उमटलेल्या स्मिताची,
डोळ्यात सजवलेल्या स्वप्नांची,
माझ्या गळ्यावरील तुझ्या ओठांच्या व्रणांची,
अन... क्षण क्षण गुंफून सजवलेल्या पहिल्या रात्रीची...
लाव किंमत,
चुरगळलेल्या चादरीची, कोमजलेल्या मोगऱ्याची,
विसरली नसशीलच,
पांढरे शुभ्र सागर किनारे,
सूर्य झाकोळणारे पक्ष्यांचे थवे,
बेधुंद नाचवणारे मद्याचे प्याले,
अन... एकमेकांत हरवायचो ते क्षण फसवे...
लाव किंमत,
अधीर मनांची, एकमेकांना दिलेल्या वचनांची,
स्मरतील कदाचित,
भरवलेले घासातले घास,
दिलेले शब्द, केलेले घात,
उदरात बाळाची लागलेली चाहूल,
अन... घराखाली तुझ्या ताटकळत सरलेली माझी रात...
लाव किंमत,
प्रत्येक स्मरणाची, अपूर्ण स्वप्नांची
जपल्याही असशील,
मी दिलेल्या कविता,
तुझी लिहिलेली वर्णन ,
विखुरलेली गांठणाची पोत,
अन... शब्दा शब्दात साचलेल्या वेदना
लाव किंमत,
प्रत्येक कवितेची, ओळीतल्या प्रत्येक शब्दाची
No comments:
Post a Comment