Tuesday, December 6, 2011

साथ तुझी सोडणार नाही

साथ तुझी सोडणार नाही
उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही...
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध...
तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ?
तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे...
म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा...
तू राहशील का माझी ?

कधी असंही जगावं लागतं

कधी असंही जगावं लागतं,
खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,
कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबावं लागतं, इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं,
तीव्र इच्छा असून देखील नाही म्हणावं लागतं,
खूप प्रेम असुन देखील नाही असं दाखवावं लागत,
............असं इतरांना हसवता हसवता कधी खूप रडावं लागतं,
कधी असही जगावं लागतं !

लाव किंमत, प्रत्येक कवितेची, ओळीतल्या प्रत्येक शब्दाची

प्रत्येक दिवसाची... तासाची... क्षणाची...

आता मी पण उभा आहे बाजारात...
आठव, आणि लाव किंमत,

गालावर उमटलेल्या स्मिताची,
डोळ्यात सजवलेल्या स्वप्नांची,

माझ्या गळ्यावरील तुझ्या ओठांच्या व्रणांची,
अन... क्षण क्षण गुंफून सजवलेल्या पहिल्या रात्रीची...

लाव किंमत,
चुरगळलेल्या चादरीची, कोमजलेल्या मोगऱ्याची,

विसरली नसशीलच,
पांढरे शुभ्र सागर किनारे,

सूर्य झाकोळणारे पक्ष्यांचे थवे,
बेधुंद नाचवणारे मद्याचे प्याले,
अन... एकमेकांत हरवायचो ते क्षण फसवे...

लाव किंमत,
अधीर मनांची, एकमेकांना दिलेल्या वचनांची,

स्मरतील कदाचित,
भरवलेले घासातले घास,

दिलेले शब्द, केलेले घात,
उदरात बाळाची लागलेली चाहूल,
अन... घराखाली तुझ्या ताटकळत सरलेली माझी रात...

लाव किंमत,
प्रत्येक स्मरणाची, अपूर्ण स्वप्नांची

जपल्याही असशील,
मी दिलेल्या कविता,

तुझी लिहिलेली वर्णन ,
विखुरलेली गांठणाची पोत,
अन... शब्दा शब्दात साचलेल्या वेदना

लाव किंमत,
प्रत्येक कवितेची, ओळीतल्या प्रत्येक शब्दाची

तुझा सहवास जणू

तुझा सहवास जणू
चंद्राची शीतल छाया,
नशिबान मिळाली मला
तुझी अगणित माया,

नसतेस जवळ जेंव्हा
तुझेच भास मला,
श्वास उरी भारतात
तूच आहेस खास मला,

नको दूर जाऊ कधी
प्रीत ठेव माझ्यावरी,
सांझच्याला थांबशील का
आडवी माझ्या वाटेवरी,

कधी कधी भेटीगाठी
सहज करू नदीकाठी,
तूच माझी रातराणी
होशील का या राजासाठी.

-
बाजी दराडे

Monday, December 5, 2011

आता फारशा कविता नको करीत बसू

फारशा कविता नको करीत बसू ..!!
[एका काविमित्राचे नुकतेच लग्न ठरलेय. त्याला जरा उपदेश.
किंवा ज्या कवी मित्रांचे लग्न ठरलेय त्याना देखील ...]


आता आताशी फारशा कविता नको करीत बसू
थोडेसे मन मोकळे ठेव ,शब्दांच्या मोहात नको फसू
तुझे लग्न ठरलेय म्हणून हे म्हणतोय
थोडासा मनाला आराम दे म्हणतोय
शब्दाची शेती नको करीत बसू
फुलबागा शब्दांच्या नको फुलवीत बसू
ती आली की तिच्याशी थोडेसे बोलत बस
मनमोकळे होऊन जरासा हस
जरासा हसलास की कसा छान दिसशील
मग जरासा तिच्या डोळ्यात बघ
चांदणे कसे फुलून जाईल
मग तू मोहरून जाशील
कविता काय...?
कधीही फुलतील
कधीपण जमतील
कवितेचे ढग कधीपण जमतील
हलके हलके बरसून जातील
चिंब होऊन भिजून जाशील
ती अलगद येईल नि तू हलकेच गाशील

म्हणून म्हणतोय आता आताशी फारशा कविता नको करीत बसू
थोडेसे मन मोकळे ठेव, शब्दांच्या मोहात नको फसू ...!!
-
Prakash Redgaonkar

तू आठवत राहतेस...!!

तू आठवत राहतेस...!!
कसे आभास होत असतात मला
कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या
तू आठवत राहतेस संध्याकाळी
तिन्हीसांजेला,
कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या
ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी
अलगद पावलांनी
किती दूर आहेस तू
नि मी असा परदेशी
फक्त एकटा
माझ्या खिडकीतून बघत बसतो
हे खिन्न आभाळ
नि घराकडे परतणारी पाखरे


तुझ्या आठवणीचे
किती काहूर उठतात मनात माझ्या
नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे
गच्च कल्लोळ नुसता
मी गुदमरून जातो
तुझ्या आठवणीत


मग कधीतरी अचानक
फोनवर बोलताना दिसू लागतो मला
देवघरातील दिवा
नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव
किती शांत पणे सहन करीत असतेस
माझा विरह
मुलाना सांभाळीत
हे सगळे आठवून
हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो
माझ्या मनातला
नि हलके हलके शांत होऊन जाते मन
मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थनापाखरासारखी निशब्दपणेपंख मिटून
झाडा -पानात हरवून जाते
तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी
माझेही मन होऊन जाते निशब्द
मन मिटवून
प्रार्थनेच्या स्पंदनात
आत्ममग्न
तुला विसरण्याचा
एक छोटा प्रयत्न ...

Sunday, December 4, 2011

रात ही विझली आता तरी येशील का?

रात ही विझली आता तरी येशील का?

ओढ लागली तुझ्या भेटीची कवटाळून जवळ घेशील का?

फक्त तुझे काही क्षण माझ्या नावावर करशील का?
...
तुझ्या अल्लड प्रेमाने माझी रिक्त ओंजळ भरशील का?

रात हि विझली आता तरी येशील का?

तुझा ओठांचा मरंद माझ्या ओठांवर देशील का?

तू अबोल राहून मला बोलक करशील का?

तुझ मन कधी माझ्याजवळ हलक करशील का?

रात हि विझली आता तरी येशील का?

पहाटेला मिठीत घेऊन क्षितिजाकडे झेप घेशील का?

जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना

जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना,
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना,
ुटून गेलेत सर्व धागे आता तुझी ना कुणी मी,
विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेहि,
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते,
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे.......
कळे न कुठले तुफान आले,लुटून नेले दिव्यांना,
अनोळखी लागले दिसू मी तुझ्याच मग डोळ्यांना,
अशी तुझी हि नजर बदलली,तुला कशास विचारू?
आता न फिरशील कधी न मागे,तुला कशास पुकारू?
नव्या दिशा अन नवीन वाटा, तुझा नवीन किनारा,
दिलास तू सोबतीस मजला,भयाण वादळवारा,
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते,
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे.......
मनात जे एक स्वप्न होते, ताडेच त्याला गेले,
जाळून गेली तहान माझी,तृषार्त ओठ जळाले,
जरी किती पूर आसवांचे,उरात माझ्या आले,
टिपूसही पापणीत नाही, सुकून गेले डोळे,
उन्हात माझा प्रवास आता, नसेल सोबत कोणी,
कधीतरी सापडेल तुजला,धुळीत माझी विराणी,
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते,
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे......
जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना,
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना,
तुटून गेलेत सर्व धागे आता तुझी ना कुणी मी,
विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेहि,
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते,
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे.......

Saturday, December 3, 2011

परत कर ते माझे क्षण

परत कर, परत कर.
परत कर ते माझे क्षण,
जे तुझ्यासाठी मी घालवले होते.
परत कर ते माझे मन,
जे तुझ्यासाठी कधी झुरले होते.
परत कर ते माझे हसू,
जे तुझ्यासाठी मी विसरलो होतो.
परत कर ती माझी आसवे,
जेंव्हा तुझ्यासाठी मी रडलो होतो.
परत कर ते माझं स्वप्न,
जे मी तुझ्यासाठी पाहीले होते.
परत कर ते माझं प्रेम,
जे तुझ्यावर मी केले होते.
परत कर ते ह्रदयातले स्पंद,
जे तुझ्यासाठी धडकले होते.
परत कर त्या फुलाचा गंध,
जे तुझ्यासाठी मी आणले होते.
परत जोड ती माझी नाती,
जी मी तुझ्यासाठी तोडली होती.
परत कर ती कविता
जी मी तुझ्यासाठी रचली होती.
परत कर तो माझा विश्वास,
जो मी तुझ्यावर खुप ठेवला होता.
परत कर माझ्या आयुष्याचा खेळ,
जो मी तुझ्यासाठीच मांडला होतो.
अन् जाता जाता एवढच् सांगतो मी तुला,
जमल तर परत कर ते सर्वस्व,
जे मी तुझ्यापाशीच विसरलो होतो.