Tuesday, January 28, 2014

शल्य टोचले कधीच नाही

स्फुल्लिंगावर राख एवढी, रान पेटले कधीच नाही
जीवन जगलो पिंजर्‍यातले, शल्य टोचले कधीच नाही

"कष्ट करोनी पोट भरावे" कसेबसे हे शक्य जाहले
क्षितिजाच्याही पुढे जगावे असे वाटले कधीच बाही

स्फुरण पावती बाहू ज्यांचे त्या योध्द्यांची जिद्द आगळी
दान करोनी कवच कुंडले युध्द टाळले कधीच नाही

जन्मपत्रिका जुळल्या नव्हत्या, एकाला मंगळही होता
पेम भावना उदात्त इतकी, कुणी भांडले कधीच नाही

प्रवचानातुनी ज्ञान सांगणे पेशा झाला कैकजणांचा
जे सांगितले ते स्वतःने तत्व पाळले कधीच नाही

जन्म मरण या शापांमधले अंतर म्हणजे जीवन असते
तरी सुखाच्या मागे पळणे व्यर्थ भासले कधीच नाही

आठरा वर्षे सरण्याआधी प्रौढ वयाचे गुन्हे करावे
बाल बलात्कार्‍याला फाशी दिली, ऐकले कधीच नाही

संजय होता पत्रकार पण हळू बातम्या सांगत होता
न्यूज ब्रेकने धृतराष्ट्राचे पित्त खवळले कधीच नाही

प्रेम दावण्या ताजमहल का? "निशिकांता"ला कधी न कळले
अमर प्रेम कबरीत पुरावे मनास पटले कधीच नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment