बिनचेहर्याच्या फेसबुकावर.. अशी कशी ही माया जडली
मला नेमके काय जाहले?
काय कळेना किमया घडली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?
विश्व जाहले गाव चिमुकले
फेसबुकाची तिथे चावडी
किती निरर्थक गपागोष्टी !
चर्चा कुठली नसे वावडी
संगणकाला चिकटुन असतो
झोप हरवली, अक्कल सडली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली?
तो आहे का ती आहे ती ?
नसून माहित चॅटिंग करतो
प्रोफाइल तो फेक असूद्या
रोमँटिक गप्पात हरवतो
आभासाला सत्त्य मानणे
हीच बिमारी जगास नडली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?
कॉपी, पेस्टिंग, डाउनलोडिंग
असेच कांही बोलत असतो
नको नको त्या विषयासाठी
गुगल सर्च मी मारत बसतो
नकोच मदिरा, संगणकाची
नशा केवढी आहे चढली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली
वेळोवेळी फेसबुकावर
फोटो माझा बदलत असतो
वाहवा!, लाइक्स किती मिळाले
पुन्हा पुन्हा मी मोजत असतो
खूप प्रसिध्दी मला लाभली
भूल ही मना आहे पडली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली
व्यसनमुक्त मी होण्यासाठी
आश्रमात बाबांच्या गेलो
केली तेथे ध्यानधारणा
इलाज होता परतुन आलो
जुनीच ओळख पुन्हा मिळाली
खोल मनी जी होती दडली
बिनचेहर्याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment