Monday, February 25, 2013

उधारीचं हसू आणून...


उधारीचं हसू आणून...
विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )

चुली जवळ माय,
तर कंपनीत तुम्ही राबत होता..
.
.
माझी वाट तुम्ही,
ते नऊ महिने पाहत होता..
.
.
पाळण्यात मला पाहून,
पेढे वाटायलाही पळाला होता..
.
.
बोटाला तुमच्या धरून,
शाळेत दाखला मी घेतला होता..
.
.
फाटकी बनियन तुम्ही,
तर नवीन गणवेश
मी घातला होता..
बाबा,
.
.
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
ताप मला असो का ताईला,
रात्र-रात्र तुम्ही जागत
होता..
.
.
शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत
होता..
.
.
बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
देवा,
आता मात्र मला,
त्यांच्यासाठी कष्टकरू दे..
.
.
तू फक्त आता,
जगातील सर्व बाबांना,उदंड आयुष्य दे... :)

Tuesday, February 19, 2013

धावत असतो


"घर की मुर्गी दाल बराबर" असा तिच्याशी वागत असतो
मूर्ख कसा मी? मृगजळ पुढती मागे मागे धावत असतो

"आधी केले मग सांगितले" तत्व पाळले जुन्या पिढीने
आज मुखवटे, वरून भगवे, खर्‍या शुचित्वा शोधत असतो

खांद्यावर खेळवले ज्यांना उडून गेले, कलेवराला
मी मेल्यावर द्या खांदा हे शेजार्‍यांना विनवत असतो

देवाला मी दगड मानले गुर्मी होती मला यशाची
ठेच लागली अशी ! अता मी वारीमध्ये चालत असतो

शब्द अडकणे ओठामध्ये जुनी बिमारी माझी आहे
व्यक्त व्हावया शब्दफुलांना गजलांमध्ये गुंफत असतो

आयुष्याच्या कंगोर्‍यांना शाप लाभला दु:खाश्रूंचा
तरी बाभाळीच्या काट्यांना कुर्‍हाड घेउन साळत असतो

मोजकेच क्षण जीवन ज्यांचे मोत्यासम ते चमकत जगती
भल्या पहाटे दवबुंदूंना भाग्य तयांचे मागत असतो

हातामध्ये हात मिळाला तुझा त्या क्षणी झुंज संपली
बेफिकिरीने आयुष्याला आज वाकुल्या दावत असतो

होश हरवले "निशिकांताचे" मयखान्याविन तुला भेटता
जगावयाचे कारण आता तुझ्या भोवती हुडकत असतो

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Monday, February 18, 2013

प्रेम आणि मैत्रीतला फरक

माझ्या वाचण्यात आलेला एक पत्र व्यवहार,,,,,

किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही.
रागावलीस ना... माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू '
मैत्री ' म्हणत होतीस त्याच नात्याला मी ' प्रेम ' म्हणालो म्हणून ? तसं असेल
तर मला कीवच करावीशी वाटते तुझी. कारण ना तुला ' मैत्री ' चा अर्थ कळलाय आणि ना
' प्रेमा ' चा. अगदी तू म्हणतेस त्याप्रमाणे तू मैत्रीण असतीस ना माझी तर मी '
तुझ्या माझ्या नात्याला ' ' प्रेमा ' चं नाव दिल्यावर तू अशी रागावली नसतीस
माझ्यावर.

प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे माहिती आहे तुला ? मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ
शकतं बऱ्याचदा पण प्रेमातून मैत्रीचा सूर उमटेलच असं नाही सांगता येत काही.
प्रेमातून बऱ्याचदा आकाराला येतो अधिकाराचा अंकुर. आता तू म्हणशील, " मग
श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?"

खरं सांगू ! असं नाही सांगता यायचं काही. पण एवढ नक्कीच सांगेन कि प्रेमाच्या
पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.

तू म्हणशील, " म्हणजे कशी ? "

आभाळासारखी आणि मातीसारखी. क्षितिजाशी पाहिलं तर एकरूप झालेली. प्रत्यक्षात
मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीनं नव्हे………..एक मर्यादा
म्हणून.

आता तू म्हणशील, " मग प्रेम कसं असतं ? "

प्रेम असतं असतं नदी आणि समुद्रासारखं………मिलनाची आस असलेलं.

मला माहिती आहे यावर तू काय म्हणणार आहेस ते. आता तू म्हणशील, " बस्स s s s !!!
एवढंच ! प्रेम म्हणजे मिलनच का फक्त ? "

नाही ! प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक पदर असतो. श्रद्धेचा
!!!!

होय !!!! श्रद्धेचा. ईश्वरावर असावी तशी श्रद्धा.

म्हणूनच मला मीरा हीच खरी प्रेयसी वाटते कृष्णाची.
प्रसंगी कृष्णासाठी वीष प्राशन करणारी ………पण कृष्णाशी एकरूप होऊ पहाणारी . आपण
मात्र म्हणतो, मीरेची भक्ती होती कृष्णावर. पण श्रद्धा आणि भाक्तीतला फरक
स्पष्ट करता येईल कुणाला ?

पण आजकाल प्रेमातल्या श्रद्धेच्या या जरतारी पदराची जाणीवच नसते कुणाला.
सौन्दर्य……….त्याची ओढ………त्याचं आकर्षण…………त्याची आसक्ती………आजकालच्या प्रेमाची
एवढीच झेप.

मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, हेच ना, " तू जर मीरेला प्रेयसी म्हणतोस
कृष्णाची तर मग राधा कोण ? "

मी राधेला मैत्रीण मानतो कृष्णाची………रासक्रीडे पासून शृंगारापर्यंत कृष्णाला
सोबत करणारी , साथ देणारी……….प्रत्येक पावलाला त्याला समजून घेणारी. आणि
म्हणूनच राधेन मैत्रीची सीमा कधी ओलांडली आणि ती कृष्णाची सखी कधी झाली हे
कळंलच नाही आपल्याला. आणि आपण करत राहिलोत एकंच जप , " राधे – शाम………राधे –

कळलाय तुला प्रेम आणि मैत्रीतला फरक ?

thx - मयूर आपटे

Sunday, February 10, 2013

शोधेन नक्की


सर्व मिथ्या सत्त्य मी शोधेन नक्की
त्यास मी सिंहासनी बसवेन नक्की

राख जमलेली तरी विसरू नका हे
सुप्त ठिणगी मी कधी पेटेन नक्की

वेष भगवा अन् खडावा घातल्या पण
मोह सुटला जर कधी सांगेन नक्की

चार दुर्वा वाहिल्यावर वाटते की
पुण्य केले स्वर्ग मी मिळवेन नक्की

रंजल्यांना अर्थमंत्री झूठ सांगे
योजना बनवून मी भेटेन नक्की

आसवे गाळीत जे जगतात त्यांना
गावयाला गीत मी शिकवेन नक्की

कैक वर्षे जाहली मी हेच म्हणतो
आज पीतो मी उद्या सोडेन नक्की

देव का नुसताच म्हणतो साधकांना?
भाव चरणी ठेव मी पावेन नक्की

फेसबुक प्रेमी म्हणे "निशिकांत" आता
ऑनलाइन गाठ मी बांधेन नक्की

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Friday, February 8, 2013

तेज कोठे हरवले?


का दिसे अंधार सारा, तेज कोठे हरवले?
काळजाला काळजीने खूप आहे ग्रासले

वेध ग्रहणी लागण्या आधीच का अंधारले?
राहुकेतूंचा दरारा सर्व जग धास्तावले

बेगडी अश्वासनावर लोक सारे भाळले
का दिले निवडून त्यांना? आम जन पस्तावले

पेटुनी उठणे अताशा ना दिसे रस्त्यावरी
रोजचे अन्याय बघुनी लोकही निर्ढावले

वेग आता शब्द झाला परवलीचा जीवनी
कासवाची अन् सशाची गोष्ट सारे विसरले

फेसबुकवर रोज माझा टाकते फोटो नवा
"मस्त, सुंदर" वाचुनी प्रतिसाद वाटे चांगले

कायद्याला तोडणारे कायदे करती इथे
का गुन्हेगारास आम्ही संसदेवर धाडले?

का अचानक भळभळाया लागल्या जखमा जुन्या?
लागता डोळा जरासा कोण ते डोकावले?

आकडेवारी यशाची का दिली बिकिनी परी?
दावले दावावयाचे, जे हवे ते झाकले

आत्मघाती पाहिली "निशिकांत" दोस्ती काल मी
सूर्यकिरणांना धुक्याने मित्र जेंव्हा मानले

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Monday, February 4, 2013

साई भजन


रात अंधेरी आयी तो क्या?
नाम उसीका जपते रहियो
साई सूरज, वही चंद्रमा
स्मरण उसीका करते रहियो

मोह विषय का घना कोहरा
बना है जीवन मेरा साई
राह कौनसी चुन ली मैने?
जीवन है दुखियारा साई
साई तारणहार सभी का
भक्तिभावसे झुकते रहियो
साई सूरज, वही चंद्रमा
स्मरण उसीका करते रहियो

भाग भाग कर सुख के पीछे
व्यर्थ बिताया जीवन मैने
आखिर तेरेही चरणों मे
पाया तीरथ पावन मैने
जान गया हूं झूठ संपदा
मृगजल सारा, बचते रहियो
साई सूरज, वही चंद्रमा
स्मरण उसीका करते रहियो

आज जहाँ मे क्या है मेरा?
सांस तुम्हारी, आंस तुम्हारी
भूल गया मै जग को साई
चाहत दिल मे जगी तिहारी
यही कामना, सिरपर मेरे
हाथ तिहारा रखते रहियो
साई सूरज, वही चंद्रमा
स्मरण उसीका करते रहियो

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

हवी आहेस तू...

पावसात भिजताना
मला तुझा आडोसा द्यायला
माझ्यासवे चिंब होऊन
मिठीत शिरायला....
हवी आहेस तू...

माझ्या कुशीत राहून
रात्रभर चांदण्या मोजायला
"चंद्र सुंदर कि मी...?"
असे वेडे प्रश्न विचारायला....
हवी आहेस तू...

रात्रीचे आभाळ उराशी घेऊन
चांदण्या तुझ्या केसात माळायला
माझ्या मिठीचे मऊ मखमल पांघरून
गुलाबी थंडीच्या रात्रीला
हवी आहेस तू...

तुला पाहण्या जीव आसुसलाय
नजर लावून बसलोय जिथे
एकदा येउन बघ त्याच वाटेला
त्या वात बघणा-या
वेड्या मनाला समजवायला
हवी आहेस तू...
हवी आहेस तू...

♥ Sid ♥

Sunday, February 3, 2013

मनाजोगते जगत रहावे


हसणार्‍यांनी हसत रहावे
रडणार्‍यांनी रडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

शिल्पकार मी माझा आहे
हवे तसे मी मजला घडविन
वरदहस्त मज नको कुणाचा
वाट कंटकांची मी तुडविन
एकलव्य आदर्श ठेउनी
स्वतः स्वयंभू घडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

लांबी बघुनी अंथरुणाची
पाय पसरणे पसंत नाही
बुलंद माझे उंच इरादे
विचार करण्या उसंत नाही
विश्वासाने घेत भरारी
क्षितिजापुढती उडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

भिष्म प्रतिज्ञा मीही केल्या
शरपंजर पण कधी न झालो
अभिमन्यू मी सळसळणारा
चक्रव्युहाला कधी न भ्यालो
मरावयाच्या अधी लाखदा
भ्याडासम का मरत रहावे?
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

आज बळी तो कानपिळी हे
सत्त्य जरी का जगा वाटते
अल्पसंख्य जे जरूर आहे
सत्त्य कधी का हार मानते?
प्रत्त्यंचा ओढीन अशी मी
सर्व जगाने बघत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

संध्याछाया दिसू लागता
मनी एवढा खेद कशाला?
जे जगलो ते सुरेख जगलो
सुखदु:खाचा भेद कशाला
पाश तोडुनी संसाराचे
हासत हासत सरत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Friday, February 1, 2013

मौन

मौन माझ्या अंतरीचे बोलते माझ्यासवे
नेहमी पिंगा धरोनी खेळते माझ्यासवे

मौन आहे गीत माझे मौन माझा सूरही
मौन तारा अंतरीच्या छेडते माझ्यासवे

सांगण्या आनंद माझा कोण आहे आपुले?
मौन हाती हात धरुनी नाचते माझ्यासवे

खूप आले खूप गेले शेवटी मी एकटा
मौन करते साथ अंती चालते माझ्यासवे

वाढतो शब्दावरूनी शब्द हे आहे खरे
मौन उत्तर द्यावयाचे टाळते माझ्यासवे

काय मी केली कमाई? सांजवेळी प्रश्न हा
मौन, उरले काय हाती, मोजते माझ्यासवे

मौनव्रत घेऊन बसलो ईश्वराला प्रार्थण्या
श्रीहरी स्वप्नात झाले बोलते माझ्यासवे

प्रश्नचिन्हांचीच आहे मालिका जगणे जगी
मौन सार्‍या उत्तरांना शोधते माझ्यासवे

केवढे "निशिकांत" आहे वेड मौनाचे तुला?
मौन ना लढता झगडता नांदते माझ्यासवे



निशिकांत देशपांडे मो.क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com